
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाच्या सुचनेनुसार अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची महत्वपुर्ण बैठक नुकतीच सुनिल पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आगामी कार्यकाळासाठी नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक दत्ता भांडवलकर यांची अध्यक्षपदी तर अशोक दोडके यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
जिल्हा संघाच्या कामकाजाला अधिक गती देण्यासाठी खालीलप्रमाणे सर्व समावेशक कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत जिल्हा कार्याध्यक्षपदी दिलीप पवार, उपाध्यक्षपदी जी.टी. गमे व अनंता खेत्रे, सहसचिव पदी निवृत्ती इले, खजिनदारपदी बाळासाहेब वाकचौरे तसेच सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून म्हातारदेव टेमकर, आरोग्य प्रतिनिधी म्हणून साहेबराव भणगे, सहल प्रतिनिधी म्हणून भास्करराव सांगळे, कायदेविषयक सल्लागार प्रतिनिधी म्हणून शांताराम डोंगरे तर महिला प्रतिनिधी म्हणून लताताई डांगे यांची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय सर्जेराव मते, भाऊसाहेब रोहकले, बी.एल. ठोकळ, अभिमन्यू चव्हाण, ३ पानदेव खराडे यांची सदस्य म्हणून तर बाळासाहेब कळसकर यांचा मार्गदर्शक म्हणून समावेश करण्यात आला. यानिवडीसाठी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडीत, माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिथुन डोंगरे, तर विभागीय प्रतिनिधी म्हणून राजेंद्र सोनवणे यांची विशेष सहकार्य लाभले.
नवीन कार्यकारिणीमुळे संघाच्या कार्याला चालना मिळणार असुन जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्यांना एक वेतनवाढ, नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या सेवकांच्या ग्रॅच्युटीच्या रक्कमेबाबत असणारा फरक, पेन्शन विक्रीच्या वसुलीचा कमी केलेल्या कालावधीची अंमलबजावणी तसेच विविध प्रलंबीत प्रश्नांबाबत सातत्याने जिल्हा संघामार्फत पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी आपल्या प्रलंबीत प्रश्नांसाठी जिल्हा संघाशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.




















