विरभद्र मंदिर ट्रस्टची मानाची होळी

राहाता (प्रतिनिधी)
होलिका दहनाच्या पवित्र आणि धार्मिक वातावरणात यंदा राहाता शहरात एक अनपेक्षित घटना घडली आणि शहराच्या राजकीय-सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. वर्षानुवर्षे जपली गेलेली परंपरा मोडली गेल्याने नागरिकांमध्ये संभ्रम, नाराजी आणि प्रश्नचिन्हांचे सावट निर्माण झाले आहे.
शहराची मानाची होळी पेटवण्यासाठी यंदा लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक उपस्थित दिसले नाहीत. कारण मात्र गुलदस्त्यात असल्याने विविध तर्क-वितर्कांना उधाण आले. खात्रीलायक माहितीनुसार, विरभद्र देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांना औपचारिक निमंत्रणच देण्यात आले नाही.
आजवर कधीही न घडलेली ही घटना नेमकी यंदाच का घडली? ज्या नगराध्यक्षांना संपूर्ण शहराने विश्वासाने, भरभरून मतांनी सन्मानाने निवडून दिले, त्यांनाच या धार्मिक परंपरेपासून दूर ठेवण्यामागे नेमकं कारण काय? हा केवळ निमंत्रणाचा प्रश्न आहे का, की यामागे काही राजकीय किंवा वैयक्तिक मतभेद दडलेले आहेत? राजकारणात धर्म की धर्मात राजकारण? असा सवाल आता उघडपणे केला जात आहे.
हा मुद्दा केवळ एका कार्यक्रमाचा नाही; तो लोकशाहीने निवडलेल्या प्रतिनिधींच्या सन्मानाशी निगडित आहे. सामाजिक सलोखा, परंपरा आणि लोकशाही मूल्ये यांचा समतोल राखला गेला पाहिजे, अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. धर्म हा एकत्र आणण्यासाठी असतो; तो विभागण्यासाठी नसतो, अशी भूमिका अनेकांनी मांडली.
चौकट

राहाता शहराच्या इतिहासात प्रथमच सार्वजनिक मानाच्या होळीच्या कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक अनुपस्थित दिसले. वीरभद्र ट्रस्टकडून आमंत्रण देण्यात आले नव्हते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रस्टचे पदाधिकारी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मर्जीतले मानले जातात, तसेच नगरपरिषदही त्याच पॅनलची आहे. तरीही लोकनियुक्त प्रतिनिधींना दूर ठेवणे हा जाणीवपूर्वक उपमर्द असून एका विशिष्ट लॉबी कडून त्यांच्या राजकीय खच्चीकरणाचा प्रयत्न सुरू आहे. असे परखड मत सामाजिक कार्यकर्ते व प्राध्यापक अनिल पावटे सर यांनी व्यक्त केले.
चौकट
दरम्यान, ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय सदाफळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, सेक्रेट्रीच्या नजरचुकीने आमंत्रण राहून गेले असावे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. यात कुठलेही राजकारण किंवा व्यक्तीद्वेष नाही. मागील काळात पालिका बॉडी अस्तित्वात नव्हती, त्यामुळे मंदिर भक्त व ट्रस्ट पदाधिकारी होळी पेटवत होते.

स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी सेक्रेटरी हा पगारी माणूस आहे त्याला जे सांगण्यात येते तेच तो करतो परंतू प्रश्न कायम आहेत. राहाता शहरातील नागरिकांना सत्य जाणून घ्यायचे आहे. परंपरेची अखंडता, लोकप्रतिनिधींचा सन्मान आणि सामाजिक ऐक्य यांचे भान राखत या प्रकरणाचा उलगडा होणे गरजेचे आहे.




















