आज रक्षा बंधन भावा बहिणीच्या अतूट नात्याचा पवित्र सण..मात्र पोलिस दलातील अधिकारी कर्मचारी बांधवांना ह्या पवित्र दिनी देखील आपले कर्तव्य निभावताना आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जाता येत नाही…मग शिर्डीतील विविध शाळांतील चिमुकल्या मुलींनी शिर्डी पोलिस स्टेशनला जात अधिकारी व कर्मचारी वर्गाला राखी बांधत नात्यांचं अनोख पावित्र्य जपलं… हे आनंदाचे क्षण सर्वजण अनुभवत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या कार्यालयात एक डॉक्टरांचा पांढरा सदरा घातलेली पंचविशीतली मुलगी प्रवेश करते..पाठोपाठ साधा शर्ट आणि पॅन्ट घातलेला खांद्यावर रुमाल टाकलेला रांगड्या शरीरयष्टीचा भेदक नजरेचा तिचा पिता… कधीकाळी आपल्या गुन्हेगारी कारवायांनी भल्या भल्यांची भंबेरी उडविणारा कुख्यात गुन्हेगार आज आपले खांदे झुकवून मुलीच्या मागोमाग उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या निमंत्रणावरून पाहुणा म्हणून आला होता

अनेक वर्षे गुन्हेगारी क्षेत्रात बदनाम झालेला हा पिता आपल्या मुलीच्या शिक्षणाची ओढ अन् कुटुंबाची होत असलेली ओढाताण उघड्या डोळ्यांनी पाहत होता मात्र शिर्डी पोलिस स्टेशनला गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले तसेच शिर्डी सह अहिल्यानगर मधील गुन्हेगारांची खडानखडा माहिती असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक इरफान शेख यांनी संतोष काळे याची मनाची घालमेल ओळखत त्याला गुन्हेगारी क्षेत्रातून परावृत्त करत पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची केलेली मदत आज फळाला आली आणि प्रवरा येथे डी फार्मसी शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी गरजेचा असणारा महागडा लॅपटॉप चक्क ज्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून जमिनीवर एकेरी भाषेत शिव्याशाप खात बसाव लागायचं त्याच पोलिस स्टेशन मध्ये थेट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या समोर खुर्चीवर सन्मानाने बसून स्वतः डी वाय एस पी शिरीष वमने यांनी स्वखर्चाने नवा कोरा महागडा लॅपटॉप मुलीला रक्षाबंधन निमित्त भेट दिला हा प्रसंग पाहताना मुलीसह त्या पित्याच्या अन् उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले…पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दी मागील देवमाणूस आज शिर्डी पोलिस स्टेशनला अनुभवायला मिळाला अशा अधिकाऱ्यांना साई न्यूज़ चा सलाम..
यावेळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे,जेष्ठ पत्रकार राजेंद्र भुजबळ उपस्थित होते तर आपल्या भावना व्यक्त करतांना संतोष काळे,त्यांची मुलगी नंदिनी काळे यांच्या डोळ्यात देखील आनंदाश्रु झळकले तर राजेंद्र भुजबळ यांनी देखील आपल्या २२ वर्षांच्या पत्रकारितेमधील हा पहिलाच अनोखा आनंदाचा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया दिलीय




















