चिकन विक्रेत्यांची 26 लाख 84 हजारांची फसवणूक ; एक जेरबंद
राहुरी तालुक्यातील चिकन विक्रेत्यांविरोधात तब्बल 26 लाख 84 हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा राहाता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून इतर दोघे आरोपी अद्याप फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी येथील चिकन विक्रेते अब्दुल दौलसा शेख, इब्राहिम अब्दुल शेख आणि यासीन अब्दुल शेख यांनी राहाता येथील पोल्ट्री व्यवसायिक अमित गाडेकर यांचेकडून 4 मार्च 2024 ते 13 मार्च 2024 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला. मात्र खरेदी केलेल्या मालाची रक्कम परत देण्याबाबत आरोपींनी खोटी आश्वासने देत टाळाटाळ केली. वर्ष उलटूनही पैसे न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित पोल्ट्री व्यवसायिकाने 10 ऑगस्ट रोजी राहाता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी 26 लाख 84 हजार रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, विभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन चव्हाण आणि पोलिस उपनिरीक्षक शरद लेंढे ,विनोद गंभीरे ( गुप्तचर विभाग)यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी यासीन शेख याला जेरबंद केले.
आरोपी यासीन शेख याला राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे. दरम्यान इतर दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून व्यवसायिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




















