
अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असणाऱ्या शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून शिर्डी नगराध्यक्षपद हे आता अनुसूचित जाती महिलेला मिळणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. मात्र युवानेते डॉ सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्व शिर्डीकरांचे लक्ष लागून राहणार असून काही दिवसांपूर्वी जाहीर भाषणात “दादांनी दिलेला शब्द” आज खरा होताना दिसून येत असून शेवटी शिर्डीमधे जे “साहेब म्हणतील” तेच होणार आहे अस मिश्किलपणे म्हटल होत मात्र आज तशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे
मुंबई येथे आज सोमवारी राज्यातील २४७ नगरपालिका आणि 147 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृह येथे मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत पद्धतीने काढण्यात आले.त्यामध्ये शिर्डीचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीच्या महिलेकडे गेले आहे. शिर्डी नगरपंचायतीची नगरपरिषद झाल्यानंतर प्रथमच ही निवडणूक होत असून नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा मान आता कोणत्या अनुसूचित जातीच्या महिलेला मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. कारण नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते मात्र अनुसूचित जातीच्या महिलेला आरक्षण मिळाल्यानंतर अनेकांचे स्वप्न भंग झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण व ओबीसी इच्छुकांची संख्या जास्त होती पण अनुसूचित जाती तील महिलेसाठी आरक्षण निघाल्यामुळे या इच्छुकांची मोठी पंचायत झाली आहे. आता अनुसूचित जाती महिलेला आपल्या गटाकडून , पक्षाकडून उभे करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वजण शोध चर्चा बैठका घेण्याची तयारी सुरू झाली आहे.
एकूणच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदेची निवडणूक संदर्भात चर्चा वाढली असून प्रभागातही आता निवडणुकीसंदर्भात अप्रत्यक्ष प्रचाराला वेग आला आहे. नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदासाठी आता खऱ्या अर्थाने रस्सीखेच होणार असून नगरपरिषद निवडणुकीचे पडघम प्रत्यक्षात वाजण्यास सुरुवात झाली आहे




















