इनसोर्सप्रमाणेच आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना वेतन व सवलती द्या; संदीप सोनवणे यांची मागणी

शिर्डी (शहर प्रतिनिधी):
श्री साईबाबा संस्थानमधील इनसोर्स आणि आऊटसोर्स कर्मचाऱ्यांमधील भेदभाव दूर करून, आऊटसोर्स कर्मचाऱ्यांनाही इनसोर्स कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन आणि सर्व सवलती मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ सोनवणे यांनी केली आहे. या न्याय्य हक्कांच्या मागणीसाठी लवकरच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महागाईच्या काळात तुटपुंजे मानधन आणि जाचक दंड
संदीप सोनवणे यांनी पुढे बोलताना सांगितले की, साईबाबा संस्थानमध्ये सध्या जवळपास ३ ते साडेतीन हजार आऊटसोर्स कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना अत्यंत तुटपुंजा पगार दिला जातो. त्यातच जर एखाद्या कर्मचाऱ्याने काही कारणास्तव सुट्टी घेतली, तर त्याच्या पगारातून थेट ९०० रुपये दंडात्मक कपात केली जाते. आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर विविध कारणांवरून अशा प्रकारे दंडात्मक कारवाई करून रक्कम वसूल केली जात आहे, जी अत्यंत अन्यायकारक आहे. याउलट, इनसोर्स कर्मचाऱ्यांनी न विचारता सुट्टी घेतली, तरी त्यांच्यावर अशा प्रकारचा कोणताही दंड आकारला जात नाही.
हॉस्पिटलचे कर्मचारी उपचारांपासून वंचित
विशेष बाब म्हणजे, संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त आऊटसोर्स कर्मचारी रात्रं-दिवस सेवा देत आहेत. परंतु, ज्या हॉस्पिटलमध्ये हे कर्मचारी काम करतात, तिथेच त्यांना मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना संस्थानचे सुपर हॉस्पिटल मोफत (फ्री) करून देण्यात यावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.




















