लोणी, दि.२४ प्रतिनिधी
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिन सोहळ्यास केंद्रीय सहकार राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.मिलींद जोशी उपस्थित राहणार असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य कलागौरव पुरस्काराने दहा साहित्यीकांना गौरविण्यात येणार असल्याची माहीती पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराने साहित्य, नाट्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तिंना विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणा-या पुरस्काराने गौरविण्याची परंपरा सुरु केली. पुरस्कार देण्याचे यंदाचे हे ३५ वे वर्ष आहे. प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात शुक्रवारी दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी नारळी पोर्णिमेच्या मुहूर्तावर दुपारी ३ वाजता हा समारंभ संपन्न होणार आहे. प्रवरा परिवाराने अखंडीतपणे या पुरस्कारांची पुरपंरा राखली गेली असून, यंदाचे हे वर्ष पद्मश्रींच्या जयंतीचे शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्ष असल्याने यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे महत्व विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणा-या पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या दुरदृष्टीच्या विचारांमुळे सहकार क्षेत्राने केलेली प्रगती आणि या चळवळीला प्राप्त झालेले सामाजिक पाठबळ विचारात घेवून यंदाचे वर्ष हे युनेस्कोने अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले. या पार्श्वभूमीवर यंदाच्या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रीत करण्यात आले असून, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.मिलींद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होण-या या सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले.
यंदाच्या वर्षी पुरस्कार निवड समितीने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार कोल्हापुर येथील डॉ.सुनिलकुमार लवटे यांना, राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार मुंबई येथील डॉ.मिनाक्षी पाटील, राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार डॉ.एच व्ही देशपांडे यांना देण्याचा निर्णय घेतला असून, राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार दिलीप जगताप आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार अतांबर शिरढोणकर आणि प्रसाद अंतरवेलीकर यांना देण्याचा निर्णय केला आहे.
अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार संगमनेर येथील संतोष भालेराव यांच्या लालाय्लू या कांदबरीस आणि अहिल्यानगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार संगमनेर येथील श्रीकांत कासट यांच्या दुर्ग वैभव या पुस्तकास देण्यात येणार आहे. प्रवरा परिसर पुरस्कार संदिप तपासे यांच्या काठावरची माणसं या कथा संग्रहाला वयाच्या ८० वर्षांनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनावर शोधनिबंध सादर करणारे आणि त्याचे सहकाराचा कल्पवृक्ष विठ्ठलराव विखे पाटील हे पुस्तक प्रकाशित करणारे डॉ.वसंतराव ठोंबरे यांनाही पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. या सोहळ्यास सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि साहित्यप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.




















